Friday, September 25, 2009

घराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच सिंहद्वार

सिंहद्वार : घराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच सिंहद्वार. घराचे मुख्य प्रवेशद्वार तसेच कंपाऊंड गेट दोन्हीला सिंहद्वार इतकेच महत्व आहे. घरासाठी चारही दिशांना प्रवेशद्वार करता येते फक्त ते कोठे असावे म्हणजे ते वास्तू एकाशितीपद मंडळाच्या कोणत्या पदात असावे म्हणजे त्याचा आपल्याला चांगला अनुभव येतो ते आपणास खालील आकृती व माहितीवरून स्पष्ट होईल.


   
मयमतम् (अ. ३० ओ. ४४-४६) मध्ये आलेल्या संदर्भनुसार बत्तीस पद वास्तुमंडळात महेंद्र, राक्षस (गृहक्षत, बृहत्क्षत), पुष्पदंत व भल्लाट या चार पदांवरच द्वार असावे कारण हि चारही द्वार त्यांच्या त्यांच्या अधिपती देवतांद्वारे संरक्षित असतात. बुद्धिमान लोकांना याच प्रकारच्या द्वाराची योजना आत अथवा बाहेर करणे शुभ मानले आहे बाकी सर्व द्वार दोषयुक्त मानली आहेत. तसेच ब्रह्म स्थानाच्या मधोमध (आकृतीत तुटक रेषा दाखवली आहे) द्वार दोषयुक्त मानले आहे. थोडक्यात घराचे द्वार इमारतीच्या मध्यरेषेच्या डावीकडे असावे.
 
मत्स्यपुराण मध्ये आलेल्या संदर्भनुसार पूर्वेकडून जयंत व महेंद्र या पदात, बुद्धिमान लोकांसाठी याम्य म्हणजेच यम, वितथ या पदात, पश्चिमेला पुष्पदंत व वरुण या पदात आणि उत्तरेला भल्लाट व सोम या पदात द्वार शुभ मानले आहे.

Monday, September 14, 2009

धन, ऋण, आय, नक्षत्र, वार/अंश

घराची लांबी व रुंदी यांचा गुणाकार केल्यावर त्याचे आकारमान मिळते. ते आकारमान अनुक्रमे वेगवेगळ्या ६ ठिकाणी घेवून म्हणजे अनुक्रमे - ८, ३, ९, ८, ९ व ६ याने गुणून जे उत्तर मिळते त्याला अनुक्रमे १२, ८, ८, २७, ७, ९ याने भागून जी काही बाकी राहते ते त्या घराचे अनुक्रमे धन, ऋण, आय, नक्षत्र, वार/अंश असतात. (संदर्भ संक्षिप्त नारद पुराण)

उदाहरण : घराची रुंदी १५ हाथ लांबी २५ हाथ आहे. यांना गुणल्यावर म्हणजे लांबी x रुंदी = आकारमान ३७५ हाथ मिळते. यातून त्या घराचे धन, ऋण, आय, नक्षत्र, वार/अंश मिळतात. 

धन = (३७५ x ८) / १२ = ० अर्थात १२ धन (बाकी शून्य राहते त्यामुळे)
ऋण = (३७५ x ३) / ८ = बाकी ५
आय = (३७५ x ९) / ८ = बाकी ७
नक्षत्र = (३७५ x ८) / २७ = बाकी ३ (एकूण २७ नक्षत्रे त्यातील ३ रे नक्षत्र )
वार = (३७५ x ९) / ७ = बाकी १ 
अंश = (३७५ x ६) / ९ = ० अर्थात ९ (बाकी शून्य राहते त्यामुळे)
 
धन - ऋण पेक्षा धन अधिक असेल तर ते घर शुभ समजले जाते.

ऋण - धन पेक्षा ऋण अधिक असेल तर ते घर अशुभ समजले जाते.

आय - एकूण आय ८ प्रकारचे असतात ते - (१) ध्वज, (२) धूम्र, (३) सिंह, (४) श्वान, (५) वृषभ, (६) खर, (७) गज, (८) काक / उष्ट्र. जर आय सम (२, ४, ६, ८)  म्हणजे धूम्र, श्वान, खर, काक असतील तर ते अशुभ समजले जातात व आय विषम (१, ३, ५, ७) म्हणजे ध्वज, सिंह, वृषभ, गज असतील तर ते शुभ समजले जातात.
 
नक्षत्र - घराचे जे नक्षत्र असेल त्यापासून गृहकर्त्याचे नक्षत्र मोजून जी संख्या मिळेल त्याला ९ ने भागावे जर बाकी ३ राहिली तर धननाश, बाकी ५ राहिली तर अपयश व ७ राहिली तर गृहकर्त्याचा मृत्यू असे फळ दर्शविते.
 
वार / अंश - रवी (१) व मंगल (३) वार / अंश असेल तर अग्निभय  दर्शिवते. व जर हे वार/अंश सोडून दुसरे वार/अंश असतील तर सर्व सुख प्राप्ती असे शुभ फळ मिळते.

Tuesday, September 8, 2009

वास्तुपुरुष एकाशितीपद मंडळातील ब्रह्म, दैव, मनुष्य व पिशाच्च भाग

वास्तुपुरुषाच्या एकाशितीपद मंडळात मध्य भाग ब्रह्म त्याला जोडून क्रमाने दैव त्याला जोडून मनुष्य व त्याला जोडून बाहेरील भाग पिशाच्च भाग म्हणून ओळखला जातो. तसेच मनुष्य व दैव भागात ब्राम्हण व पिशाच्च भागात कामगारांची निवासस्थाने योग्य समजली जातात. (संदर्भ मयमतम् अ. ९ ओ. ६१, ६२, ६३).
 

प्लॉट कॉम्पौंड मधील आतील भागाचे एकूण ८१ भाग (वास्तुपुरुष एकाशितीपद मंडळ)  करून त्यातील मधील ९ भाग म्हणजे ब्रह्म भाग या ठिकाणी कोणतेही बांधकाम करू नये, तसेच वरील संदर्भानुसार पिशाच्च भागात वास्तूचे बांधकाम आणू नये म्हणजे वास्तू बांधताना प्लॉट मधील एकूण ८१ भागातील पिशाच्च भाग सोडून बांधकाम करावे नाहीतर त्या वास्तूला अशुभत्व प्राप्त होते. पिशाच्च भाग सोडून बांधकाम केल्यास पुत्र-पौत्र, धन वृद्धी अशी शुभ फळे मिळतात.

Sunday, September 6, 2009

अष्टदिशा

अष्टदिशा : पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य या आठ दिशा आहेत.

१. पूर्व दिशा : या दिशेचा दिशापालक इंद्र देव आहे. त्याची पत्नी शची देवी आहे. त्याचे नगर (पूर) अमरावती आहे. त्याचे वाहन पांढरा हत्ती (ऐरावत) आहे. त्याचे आयुध वज्रायुध हे आहे. या दिशेची राशी मेष (१) , वृषभ (२) आहे. या दिशेचा रंग श्वेत (पांढरा) आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला ऐश्वर्यं लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह सूर्य (रवी) हा आहे.

२. आग्नेय दिशा : या दिशेचा दिशापालक अग्नी देव आहे. त्याची पत्नी स्वाहा देवी आहे. त्याचे नगर (पूर) तेजोवती आहे. त्याचे वाहन मेंढा आहे. त्याचे आयुध भोप (रोज) / राग (क्रोध) हे आहे. या दिशेची राशी मिथुन (3) आहे. या दिशेचा रंग लाल/तांबडा आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला धान्य लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह शुक्र हा आहे.
 
३. दक्षिण दिशा : या दिशेचा दिशापालक यम देव आहे. त्याची पत्नी शामला देवी आहे. त्याचे नगर (पूर) संयमनी आहे. त्याचे वाहन महिष आहे. त्याचे आयुध कालपाश हे आहे. या दिशेची राशी कर्क (४), सिंह (५) आहे. या दिशेचा रंग लाल आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला आदि लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह मंगळ हा आहे.

४. नैऋत्य दिशा : या दिशेचा दिशापालक नैऋती देव आहे. त्याची पत्नी दीर्घा देवी आहे. त्याचे नगर (पूर) कृष्णांग आहे. त्याचे वाहन नर (मनुष्य) आहे. त्याचे आयुध कुंत हे आहे. या दिशेची राशी कन्या (६) आहे. या दिशेचा रंग धूम्र आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला धैर्य लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचे ग्रह राहू-केतू हे आहेत.
 
५. पश्चिम दिशा : या दिशेचा दिशापालक वरुण देव आहे. त्याची पत्नी कालिका आहे. त्याचे नगर (पूर) श्रद्धावती आहे. त्याचे वाहन मगर आहे. त्याचे आयुध पाश हे आहे. या दिशेची राशी तुल (७) व वृश्चिक (८) आहे. या दिशेचा रंग लाल, तांबडा व काळा आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला गज लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह शनीदेव हा आहे.
 
६. वायव्य दिशा : या दिशेचा दिशापालक वायूदेव आहे. त्याची पत्नी अंजनी देवी आहे. त्याचे नगर (पूर) गंधवती आहे. त्याचे वाहन हरीण आहे. त्याचे आयुध ध्वज हे आहे. या दिशेची राशी धनु (९) आहे. या दिशेचा रंग पांढरा, निळा, काळा, करडा आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला विजय लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह चंद्र हा आहे.
 
७. उत्तर दिशा : या दिशेचा दिशापालक कुबेर देव आहे. त्याची पत्नी चित्रलेखा देवी आहे. त्याचे नगर (पूर) अलकावती आहे. त्याचे वाहन पांढरा घोडा आहे. त्याचे आयुध खड्ग हे आहे. या दिशेची राशी मकर (१०), कुंभ (११) आहे. या दिशेचा रंग पिवळा, पोपटी, हिरवा, पिवळसरपांढरा आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला धन लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह बुध हा आहे.
 
८. ईशान्य दिशा : या दिशेचा दिशापालक देवाधिदेव महादेव आहे. त्याची पत्नी पार्वती देवी आहे. त्याचे नगर (पूर) कैलास (हिमालय) आहे. त्याचे वाहन वृषभ (बैल) आहे. त्याचे आयुध त्रिशूळ हे आहे. या दिशेची राशी मीन (१२) आहे. या दिशेचा रंग हिरवा, पांढरा आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला संतान लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह गुरु हा आहे. 

Friday, September 4, 2009

भूमीचा आकार व उतार

भूमीचा उतार पूर्व व उत्तर दिशेकडे शुभ मनाला जातो. मयमतम् या ग्रंथात आलेल्या संदर्भानुसार,  लांबी व रुंदी समान असलेली भूमी तसेच उत्तर दिशेकडे उतार असलेली भूमी ब्राम्हण वर्णासाठी शुभ मानली गेली आहे. ज्या भूमीची लांबी रुंदीपेक्षा १/८ जास्त आहे व तिचा उतार पूर्वेकडे आहे अशी भूमी क्षत्रिय वर्णासाठी शुभ समजली आहे. ज्या भूमीची लांबी रुंदीपेक्षा १/६ जास्त आहे व तिचा उतार पूर्वेकडे आहे अशी भूमी वैश्य वर्णासाठी शुभ समजली आहे व ज्या भूमीची लांबी रुंदीपेक्षा १/४ जास्त आहे व तिचा उतार पूर्वेकडे आहे अशी भूमी शुद्र वर्णासाठी शुभ समजली आहे.

जमिनीचे / भूमीचे परीक्षण - 02

४. भूमीच्या मध्यात एक हाथ (दीड फुट) लांब रुंद व उंच असा खड्डा खोदावा. खड्डा खोदल्यावर त्यातून निघालेली माती पुन्हा त्याच खड्ड्यात भरावी. जर तो खड्डा पूर्ण भरला व तरी देखील माती शिल्लक राहिली तर अशी जमीन उत्तम समजली जाते. तसेच माती शिल्लक राहिली नाही म्हणजे ती माती बरोबर भरली तर ती जमीन मध्यम समजली जाते. आणि जर माती पूर्ण टाकल्या नंतरही तो खड्डा भरला नाही तर अशी जमीन कनिष्ठ समजली जाते. (संदर्भ समरांगण सूत्रधार अ. ८).
 
५. भूमीच्या मध्यात एक हाथ (दीड फुट) लांब रुंद व उंच असा खड्डा खोदावा व तो पूर्ण पाण्याने भरावा व १०० पावले चालत जावे आणि परत त्या ठिकाणी यावे. आल्यानंतर त्या खड्ड्यात बगावे जर पाणी तेवढेच राहिले तर अशी भूमी सर्व कार्यास शुभ समजली जाते. जर पाणी थोडे कमी झाले म्हणजे जर पाण्याची पातळी अर्ध्या खड्ड्याच्या पर्यंत अथवा थोडी वर राहिली तर अशी भूमी मध्यम समजली जाते. जर पाण्याची पातळी अर्ध्या खड्ड्याच्या खाली गेली तर अशी भूमी कनिष्ठ समजली जाते. (संदर्भ समरांगण सूत्रधार अ. ८).
 
तसेच ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र वर्णानुसार अनुक्रमे श्वेत (पांढरा), लाल, पिवळा व काळा अश्या कलरच्या फुलांच्या माळा त्या खड्ड्यात ठेवाव्यात. म्हणजेच श्वेत रंग ब्राह्मणास, लाल रंग क्षत्रियास, पिवळा रंग वैश्यास व काळा रंग शूद्रास अशाप्रमाणे  ज्या रंगाची माळ सर्वात लवकर सुकणार नाही (म्हणजे सर्वात शेवटी सुकेल). त्या रंगाच्या वार्णासाठी ती भूमी शुभ समजली जाते. (संदर्भ समरांगण सूत्रधार अ. ८). 
 
६. वर सांगीतल्या प्रमाणे एक खड्डा काढून सायंकाळी तो खड्डा पूर्ण पाण्याने भरावा व सकाळी येवून तो खड्डा परत बघावा जर त्या खड्ड्यात पाणी शिल्लक दिसले तर अशी भूमी निवास करण्यास शुभ समजली जाते. जर त्या खड्ड्यात चिखल दिसला तर अशी जमीन मध्यम समजली जाते. जर त्या खड्ड्यात भूमीला भेगा पडलेल्या दिसल्या तर अशी भूमी निवास करण्यास वर्ज्य समजली जाते तेथे निवास करू नये. 
 
७. भविष्यपुराण मध्ये आलेल्या संदर्भानुसार पाण्याच्या वर अथवा मंदिरावर राहण्यासाठी घर बनवू नये.
 
८. ब्राम्हण वर्णासाठी श्वेत रंगाची, क्षत्रिय वर्णासाठी लाल रंगाची, वैश्य वर्णासाठी पिवळ्या रंगाची व शुद्र वर्णासाठी काळ्या रंगाची जमीन शुभ समजली जाते.
 
९. ब्राम्हण वर्णासाठी गोड वासाची, क्षत्रिय वर्णासाठी रक्ताच्या वासासारखी, वैश्य वर्णासाठी अन्नाच्या वासासारखी व शुद्र वर्णासाठी मद्याच्या वासासारखी भूमी शुभ समजली जाते.
 
१०. ब्राम्हण वर्णासाठी गोड व तुरट स्वादाची, क्षत्रिय वर्णासाठी तिखट स्वादाची, वैश्य वर्णासाठी आंबट स्वादाची व शुद्र वर्णासाठी कडवट स्वादाची भूमी शुभ समजली जाते.

जमिनीचे / भूमीचे परीक्षण - 01

वास्तुशास्त्राप्रमाणे भूमीचे म्हणजेच जमिनीचे परीक्षण करणे या गोष्टीला ऋषी-मुनींनी खूप प्राधान्य दिले आहे. जमिनीचे परीक्षण कसे करावे याचे काही मुद्दे :
 
१. जी जमीन शेतीसाठी उत्तम उपजावू आहे. ज्या जमिनीवर झाडे, फुले, हिरव्या वनस्पती चांगल्या प्रमाणे वाढतात अशी जमीन चांगली समजली जाते. तसेच या जमिनी मध्ये उंदीर, घूस यांची बीळे काटेरी वनस्पती, झाडे असू नयेत अशी जमीन निकृष्ट समजली जाते. तसेच त्या भूमीत शल्य (हाडे) असतील तर अशी भूमीही वाईट समजली जाते. जर जमीन खाली वर असेल तर म्हणजे जमिनीवर योग्य उतार, सापाटपणा नसेल, जमिनीत खाच-खळगे असतील तर अशी जमीन दोषयुक्त मानली जाते. जमीन कशी आहे त्याप्रमाणे त्याचे दुष्परीणाम मिळतात. तसेच त्या जमिनिला कशाप्रकारचा गंध (वास) आहे याचाही विचार केला गेलेला आहे. दुर्गंधी जमीन वाईट समजली जाते.
 
२. भूमी मध्यात एक हाथ लांब म्हणजे साधारणता दीड फुट लांब रुंद व उंच असा खड्डा खोदावा त्यास गाईच्या शेणाने सारवावे व त्यामध्ये चार मुख दिशांना म्हणजेच पूर्व, दक्षिण, पश्चिम व उत्तर या दिशांना तुपाचे दिवे लावावे त्यापैकी जर पूर्व दिशेचा दिवा जास्त काळ तेवत राहिला तर अशी भूमी ब्राम्हण वर्णासाठी उत्तम समजली जाते. अशाप्रकारे उत्तर, दक्षिण व पश्चिम दिशेचे दिवे अनुक्रमे क्षत्रिय, वैश्य व शुद्र वर्णासाठी शुभ समजली जाते. तसेच जर चारही दिशेचे दिवे तेवत राहिले तर ती जमीन सर्व वर्णासाठी उत्तम समजली जाते.
 
३. जमीन नांगराने नांगरून त्यात सर्व प्रकारची बी (मुग, तील, गहू  ईत्यादी) पुरावीत. जर ते बी तीन रात्रीत उगवले म्हणजेच त्याला जर अंकुर फुटले तर ती जमीन उत्तम, पाच रात्रीत अंकुर फुटले तर ती जमीन मध्यम व सात रात्रीत अंकुर फुटले तर ती जमीन कनिष्ट समजली जाते अशी जमीन सर्व प्रकारच्या कार्यासाठी वर्ज्य समजली जाते. (संदर्भ मत्स्यपुराण अध्याय २५३) .