Friday, September 4, 2009

जमिनीचे / भूमीचे परीक्षण - 01

वास्तुशास्त्राप्रमाणे भूमीचे म्हणजेच जमिनीचे परीक्षण करणे या गोष्टीला ऋषी-मुनींनी खूप प्राधान्य दिले आहे. जमिनीचे परीक्षण कसे करावे याचे काही मुद्दे :
 
१. जी जमीन शेतीसाठी उत्तम उपजावू आहे. ज्या जमिनीवर झाडे, फुले, हिरव्या वनस्पती चांगल्या प्रमाणे वाढतात अशी जमीन चांगली समजली जाते. तसेच या जमिनी मध्ये उंदीर, घूस यांची बीळे काटेरी वनस्पती, झाडे असू नयेत अशी जमीन निकृष्ट समजली जाते. तसेच त्या भूमीत शल्य (हाडे) असतील तर अशी भूमीही वाईट समजली जाते. जर जमीन खाली वर असेल तर म्हणजे जमिनीवर योग्य उतार, सापाटपणा नसेल, जमिनीत खाच-खळगे असतील तर अशी जमीन दोषयुक्त मानली जाते. जमीन कशी आहे त्याप्रमाणे त्याचे दुष्परीणाम मिळतात. तसेच त्या जमिनिला कशाप्रकारचा गंध (वास) आहे याचाही विचार केला गेलेला आहे. दुर्गंधी जमीन वाईट समजली जाते.
 
२. भूमी मध्यात एक हाथ लांब म्हणजे साधारणता दीड फुट लांब रुंद व उंच असा खड्डा खोदावा त्यास गाईच्या शेणाने सारवावे व त्यामध्ये चार मुख दिशांना म्हणजेच पूर्व, दक्षिण, पश्चिम व उत्तर या दिशांना तुपाचे दिवे लावावे त्यापैकी जर पूर्व दिशेचा दिवा जास्त काळ तेवत राहिला तर अशी भूमी ब्राम्हण वर्णासाठी उत्तम समजली जाते. अशाप्रकारे उत्तर, दक्षिण व पश्चिम दिशेचे दिवे अनुक्रमे क्षत्रिय, वैश्य व शुद्र वर्णासाठी शुभ समजली जाते. तसेच जर चारही दिशेचे दिवे तेवत राहिले तर ती जमीन सर्व वर्णासाठी उत्तम समजली जाते.
 
३. जमीन नांगराने नांगरून त्यात सर्व प्रकारची बी (मुग, तील, गहू  ईत्यादी) पुरावीत. जर ते बी तीन रात्रीत उगवले म्हणजेच त्याला जर अंकुर फुटले तर ती जमीन उत्तम, पाच रात्रीत अंकुर फुटले तर ती जमीन मध्यम व सात रात्रीत अंकुर फुटले तर ती जमीन कनिष्ट समजली जाते अशी जमीन सर्व प्रकारच्या कार्यासाठी वर्ज्य समजली जाते. (संदर्भ मत्स्यपुराण अध्याय २५३) .