सिंहद्वार : घराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच सिंहद्वार. घराचे मुख्य प्रवेशद्वार तसेच कंपाऊंड गेट दोन्हीला सिंहद्वार इतकेच महत्व आहे. घरासाठी चारही दिशांना प्रवेशद्वार करता येते फक्त ते कोठे असावे म्हणजे ते वास्तू एकाशितीपद मंडळाच्या कोणत्या पदात असावे म्हणजे त्याचा आपल्याला चांगला अनुभव येतो ते आपणास खालील आकृती व माहितीवरून स्पष्ट होईल.
मयमतम् (अ. ३० ओ. ४४-४६) मध्ये आलेल्या संदर्भनुसार बत्तीस पद वास्तुमंडळात महेंद्र, राक्षस (गृहक्षत, बृहत्क्षत), पुष्पदंत व भल्लाट या चार पदांवरच द्वार असावे कारण हि चारही द्वार त्यांच्या त्यांच्या अधिपती देवतांद्वारे संरक्षित असतात. बुद्धिमान लोकांना याच प्रकारच्या द्वाराची योजना आत अथवा बाहेर करणे शुभ मानले आहे बाकी सर्व द्वार दोषयुक्त मानली आहेत. तसेच ब्रह्म स्थानाच्या मधोमध (आकृतीत तुटक रेषा दाखवली आहे) द्वार दोषयुक्त मानले आहे. थोडक्यात घराचे द्वार इमारतीच्या मध्यरेषेच्या डावीकडे असावे.
मत्स्यपुराण मध्ये आलेल्या संदर्भनुसार पूर्वेकडून जयंत व महेंद्र या पदात, बुद्धिमान लोकांसाठी याम्य म्हणजेच यम, वितथ या पदात, पश्चिमेला पुष्पदंत व वरुण या पदात आणि उत्तरेला भल्लाट व सोम या पदात द्वार शुभ मानले आहे.